मिशन ग्रीन ही माेहिम हरित पर्यटनासाठी एक चांगला संदेश- महापौर

Friday, October 2, 2026 - 20:17
मिशन ग्रीन ही माेहिम हरित पर्यटनासाठी एक चांगला संदेश-  महापौर

कल्याण (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन केडीएमसी’मुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यासोबतच हरित पर्यटनाला चालना मिळण्याचा सकारात्मक संदेश मिळत आहे, असे प्रतिपादन महापौर हर्षाली चौधरी यांनी केले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि बीपीएलसी यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नेतिवली टेकडी येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर चौधरी बोलत होत्या.

याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे, भाजप आमदार सुलभा गायकवाड, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

बीपीएलसीच्या सीएसआर निधीतून ‘मिशन ग्रीन’ अंतर्गत नेतिवली टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पुढील तीन वर्षे देखभाल बीपीएलसीकडून करण्यात येणार असून, वृक्षांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नेतिवली टेकडीचे मोठ्या प्रमाणात हरितीकरण झाल्यास या परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्याची संधी निर्माण होऊ शकते, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान एक झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, याच कार्यक्रमात ‘शाश्वत कचरा वर्गीकरण’ मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला. स्रोतावरच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास त्याची विल्हेवाट आणि पुनर्वापराची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

या उपक्रमांतर्गत सुका कचऱ्यातील कागद व प्लास्टिकसाठी प्रति किलो दोन रुपये, ई-वेस्टसाठी प्रति किलो आठ रुपये, तर इतर भंगारासाठीही मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नागरिकांना आर्थिक लाभही मिळू शकतो.

कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण आणि पुनर्वापर वाढल्यास डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा ताण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांना थेट आर्थिक मोबदला देऊन शाश्वत कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देणारा देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा उपायुक्त रामदास कोकरे यांनी केला. हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेतिवली टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0