टिटवाळ्यात सावरकरनगरचा काँक्रीट रस्ता अर्धवट; महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
कल्याण (प्रतिनिधी): टिटवाळा-मांडा परिसरातील सावरकरनगर येथील एकदंताय सोसायटी ते चार्म्स हाईट्स या मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत पडून राहिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्चाच्या या कामाला चार-पाच महिने उलटूनही उर्वरित रस्ता पूर्ण झालेला नसल्याने महापालिका प्रशासन नेमके कधी हे काम मार्गी लावणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकदंताय सोसायटी ते चार्म्स हाईट्स हा रस्ता पूर्वी डांबरी होता. रस्ता खराब झाल्याने नागरिकांना पायी चालताना तसेच वाहनचालकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडत असल्याने त्यात पाणी साचून परिस्थिती आणखी बिकट होत होती. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या मार्गावरून ये-जा करणे त्रासदायक ठरत होते.
या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एकदंताय सोसायटी ते चार्म्स हाईट्स या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासोबत चार्म्स हाईट्स ते नांदप रस्ता या मार्गाचाही कामात समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली; मात्र काही दिवसांनंतर काम अर्धवट अवस्थेत थांबले. रस्त्याच्या कडेला असलेल्या काही घरांचा भाग प्रस्तावित रस्त्याच्या कामात बाधित होत असल्याचे, तसेच रस्त्याच्या मार्गात एक झाड आणि ड्रेनेज यंत्रणेचा काही भाग अडथळा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम पुढे न करता ते अर्धवट सोडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मात्र, रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वीच प्रस्तावित मार्गातील अडथळ्यांची पाहणी आणि त्यांचे निराकरण करण्यात आले होते का? असा मूलभूत प्रश्न आता उपस्थित होत आहे. विकासकामाच्या आराखड्यात अडथळे असल्याचे पूर्वीपासूनच स्पष्ट होते, तर ते दूर न करताच काम सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. तसेच रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची होती, त्यासाठी किती कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती आणि अडथळे दूर न झाल्यामुळे काम रखडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, याची माहिती महापालिका प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
काम पूर्ण करता येणार नसेल तर ते सुरूच का करण्यात आले? आणि लाखो रुपये खर्चाच्या विकासकामाचे नियोजन करताना प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीचा विचार करण्यात आला होता का? या प्रश्नांची उत्तरे आता महापालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. दरम्यान, अर्धवट राहिलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरूच असून, महापालिकेने संबंधित अडथळे तातडीने दूर करून उर्वरित काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0