प्रियदर्शिनी पार्कमध्ये ‘दिवाळी स्वदेशी उत्सव २०२६’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट

Tuesday, November 3, 2026 - 18:16
प्रियदर्शिनी पार्कमध्ये ‘दिवाळी स्वदेशी उत्सव २०२६’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, महिला बचत गटांच्या उद्योजकतेला बळ आणि स्थानिक व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबईतील नेपियन सी रोड येथील प्रियदर्शिनी पार्क येथे ‘दिवाळी स्वदेशी उत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शहा यांच्या पुढाकारातून आयोजित या उत्सवाला शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून भेट देत उपक्रमाची माहिती जाणून घेतली.

या प्रसंगी खासदार मिलिंद देवरा, मुंबई महापालिकेच्या महापौर रितु तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या उत्सवात १०० हून अधिक महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविध स्वदेशी उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ तसेच महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी या उत्सवातून उपलब्ध झाली आहे.

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी २० हून अधिक मोफत कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे स्वदेशी उत्पादनांच्या प्रदर्शनासोबतच बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम म्हणूनही या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या स्टॉल्सची पाहणी केली. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. सण-उत्सवांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याबरोबरच स्थानिक उद्योजक आणि महिला भगिनींच्या कष्टांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उत्सवातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल ॲड. सुशीबेन शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खासदार डॉ. शिंदे यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधी म्हणून आयएमसीच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या मदतीबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

महिला उद्योजकता, स्वदेशी उत्पादनांचा प्रचार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणाऱ्या या ‘दिवाळी स्वदेशी उत्सव २०२६’ला मिळालेली मान्यवरांची उपस्थिती आणि प्रोत्साहन यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0