केडीएमसी: कर्मचाऱ्यांना बँक कर्जासाठी हमीपत्र द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Wednesday, November 4, 2026 - 18:33
केडीएमसी: कर्मचाऱ्यांना बँक कर्जासाठी हमीपत्र द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा
संग्रहित छायाचित्र

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विविध बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असलेले हमीपत्र (गारंटर लेटर) पुन्हा सुरू करावे, अशी मागणी महानगर सफाई कर्मचारी संघ, महाराष्ट्र यांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

दिवाळीसारखे मोठे सण, त्यानंतर सुरू होणारी लग्नसराई तसेच वाढत्या कौटुंबिक गरजांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन घर खरेदी करणे, घराचे बांधकाम, मुलांचे शिक्षण व विवाह तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत बँकांकडून कर्ज घेणे हा कर्मचाऱ्यांसमोरील महत्त्वाचा पर्याय असतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासनाने बँक कर्जासाठी आवश्यक असलेले हमीपत्र देणे बंद केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

हमीपत्र बंद केल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

यापूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी प्रशासनाकडून हमीपत्र दिले जात होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होत होती. मात्र, ही प्रक्रिया अचानक बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, अनेक कर्मचाऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आली असून ते सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकत असल्याचा दावा संघटनेने निवेदनात केला आहे. या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून, यासंदर्भात अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्याचेही भारत गायकवाड यांनी नमूद केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून नियमानुसार कर्जाचे हप्ते कपात करण्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. यामध्ये वेतन प्रदान अधिनियम १९३६ मधील कलम ७(२), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ४९(२) आणि महाराष्ट्र महानगरपालिका लेखा संहिता २०१० मधील नियम ३६४ यांचा आधार देण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाला हमीपत्र देण्याबाबत काही प्रशासकीय किंवा कायदेशीर अडचणी असल्यास संघटनेशी चर्चा करून त्यावर मार्ग काढावा आणि कर्मचाऱ्यांना बँक कर्जासाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशारा संस्थापक अध्यक्ष भारत गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0