पर्यावरण रक्षणासाठी थाळी वाजविण्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आवाहन
मुंबई (प्रतिनिधी): अगोदर जंगलात आगी लावायच्या, कागदोपत्री झाडांची संख्या कमी दाखवायची आणि मग प्रत्यक्षात हजारो झाडे तोडून 'कमीच झाडे तोडली' असा बनाव करायचा... निसर्गाचा हा घातपात आता खपवून घेतला जाणार नाही, अशा तीव्र शब्दांत प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.
कर्जत तालुक्यातील पाली परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी भीमाशंकरच्या संवेदनशील जंगल परिसरात वृक्षतोडीचा डाव आखला गेला असून, याविरोधात सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि संबंधित कंपनीचा बुरखा फाडला.
पत्रकार परिषदेत अत्यंत भावूक आणि तितक्याच आक्रमक शैलीत बोलताना सयाजी शिंदे यांनी प्रशासकीय कारभाराच्या चिंधड्या उडवल्या. "अडीच लाख वर्षानुवर्षे जगलेली मोठी झाडे तोडायची आणि त्या बदल्यात चिमुकली रोपटी लावून भरपाई केल्याचा दावा करायचा, हा निव्वळ मूर्खपणा आहे. भीमाशंकरचे जंगल हा समृद्ध जैवविविधतेचा भाग आहे. तिथे राहणाऱ्या आपल्या राज्यप्राणी 'शेकरू'ला आणि 'मोरा'ला तुम्ही सांगणार का की तुमचे घर आता उद्ध्वस्त होत आहे? वन्य प्राण्यांचे काय करणार, याचे उत्तर सरकारकडे आहे का?" असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
प्रकल्पाच्या मूळ स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिंदे म्हणाले, "हा प्रकल्प नेमका कशाचा आहे, त्याचे परिणाम काय होणार, हे खुद्द सरकारलाही नीट माहिती नाही. पण केवळ उद्योजकांच्या घशात जमीन घालण्यासाठी तीन-तीन गावे आणि संपूर्ण निसर्ग धोक्यात आणला जात आहे."
या प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना आपल्या मूळ अधिवासातून विस्थापित व्हावे लागणार आहे. आदिवासींना जमिनीवरून हुसकावून शहरात ढकलले जात आहे. त्यांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जात आहे. पण २० लाखांत कुणाचे आयुष्य पुनर्स्थापित होते का? त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा निसर्गाशी असलेला संबंध पैशात कसा मोजणार?" असा संतप्त सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
स्थानिक रहिवाशी प्रसाद देशमुख यांनी या वेळी प्रत्यक्ष घडलेला अनुभव सांगताना प्रशासनाच्या मनमानीवर प्रकाश टाकला. "२० ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी, जेव्हा संपूर्ण राज्य सण साजरा करत होते, तेव्हा या जंगलावर पहिली कुऱ्हाड पडली. ट्री-कटिंग मशीनचा भीषण आवाज आल्याने आम्ही नागरिक धावत बघायला गेलो, तर तिथे धडाधड झाडे पाडली जात होती," असे त्यांनी सांगत स्थानिक जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे स्पष्ट केले.
पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भीमाशंकरच्या परिसरात अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करून वीज प्रकल्प उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी आणि स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ही वृक्षतोड त्वरित न थांबवल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आला आहे. यावेळी अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0