‘आपला दवाखाना’ बंद; निवडणुकीपुरती आश्वासने, जनतेच्या आरोग्यसेवेचे काय?- कांचन कुलकर्णी
कल्याण (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांना घराजवळच मोफत आणि सुलभ प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेलाच टाळे लागल्याने राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांची आरोग्यसेवा संकटात सापडली आहे. राज्यभरातील आपला दवाखाने १ नोव्हेंबरपासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने आणि प्रलोभनांचा वर्षाव करणाऱ्या सरकारला सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेचे मात्र गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आपला दवाखाना योजनेमुळे झोपडपट्टी, कामगार वस्ती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या परिसरात प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध झाली होती. मात्र, १ नोव्हेंबरपासून हे दवाखाने बंद असल्याने गरीब, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. घराजवळच मोफत तपासणी आणि औषधोपचार मिळण्याची सुविधा बंद झाल्याने नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून, त्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
निवडणुका जवळ आल्या की सरकारकडून विविध योजना, घोषणा, आश्वासने आणि प्रलोभनांची खैरात केली जाते. मात्र, निवडणुकांचा काळ संपल्यानंतर जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. आरोग्य ही नागरिकांची मूलभूत गरज असून राजकारण आणि निवडणुकांपेक्षा जनतेचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपला दवाखाना योजना तातडीने पूर्ववत करून राज्यातील सर्व दवाखाने नियमित सुरू करावेत, अशी मागणी कांचन कुलकर्णी यांनी केली आहे. याशिवाय दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, औषधांचा नियमित पुरवठा आणि आरोग्यसेवेचे सुरळीत संचालन करण्यासाठी शासनाने ठोस व्यवस्था करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
“सर्वसामान्य जनतेला आरोग्यसेवेपासून वंचित ठेवून विकासाच्या घोषणा करण्यात काय अर्थ? निवडणुकीपुरती आश्वासने नकोत, जनतेला प्रत्यक्षात आरोग्यसेवा द्या. सरकारने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ‘आपला दवाखाना’ पुन्हा सुरू करावा. अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेच्या आरोग्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवेल,” असा इशाराही कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यभरातील आपला दवाखाने बंद पडण्यामागील नेमकी प्रशासकीय कारणे काय आहेत आणि ते पुन्हा सुरू करण्यासाठी शासन कोणती पावले उचलणार, याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0