७५ हजार खेळाडूंचे लक्ष्य; ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चा दिमाखात शुभारंभ!

Sunday, November 22, 2026 - 19:11
७५ हजार खेळाडूंचे लक्ष्य; ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चा दिमाखात शुभारंभ!

डोंबिवली (प्रतिनिधी) : मैदानावरील खेळाडूंचा उत्साह, दिमाखदार संचलन, ट्रॉफीचे अनावरण, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात ठाणे जिल्ह्यातील ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चा नुकताच भव्य शुभारंभ झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या स्पर्धेत तब्बल ७५ हजारांहून अधिक खेळाडूंच्या सहभागाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब, जलतरण, अॅथलेटिक्स, फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ यांसह एकूण ३२ क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील ३५ हून अधिक क्रीडास्थळांवर २० ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा रंगणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यात पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकविजेते प्रणव देसाई आणि युवा ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती शौर्या अंबुरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेत्री निम्रत कौर यांची उपस्थिती, महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा जागर करणारे पोवाड्याचे सादरीकरण आणि कुस्तीच्या रंगलेल्या लढतींनी सोहळ्याची रंगत वाढवली.

लहान शहरे आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही मोठे व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच स्थानिक पातळीवर आधुनिक क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डोंबिवलीतील व्हर्टिकल क्रीडा संकुल, कळव्यातील बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अंबरनाथमधील शूटिंग रेंज व क्रीडा सुविधा, कल्याणमधील शूटिंग रेंज आणि उल्हासनगरमधील मिनी स्टेडियम यांसारख्या प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.

या उदघाटन सोहळ्याला मंत्री दादा भुसे, उदय सामंत, प्रताप सरनाईक, आमदार राजेश मोरे, डॉ. बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड, रवींद्र फाटक, कुमार आयलानी यांच्यासह शिवसेनेचे चंद्रहार पाटील तसेच ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

२९ नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या क्रीडासंग्राममध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दिमाखदार उद्घाटन सोहळा, मान्यवर खेळाडूंचा सन्मान, पारंपरिक कलांचे सादरीकरण आणि कुस्तीच्या थरारक लढतींनी या महोत्सवाची सुरुवातच अविस्मरणीय ठरली असून, आगामी दिवसांत ठाणे जिल्ह्यातील विविध मैदानांवर क्रीडास्पर्धांचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0