स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे दहा समाजसेवकांना ‘कोकणरत्न’ पदवीने गौरविणार
मुंबई (प्रतिनिधी) : समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा समाजसेवकांची ‘कोकणरत्न’ पदवीसाठी निवड करण्यात आली आहे. स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे या मान्यवरांचा सन्मान शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पदवीप्रदान सोहळ्यात करण्यात येणार आहे.
स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पत्रकार सचिनभाऊ कळझुनकर सर आणि उद्योजक लायनल वेलोज सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘कोकणरत्न’ पदवीसाठी निवड झालेल्यांमध्ये रमेश बाळकृष्ण मेस्त्री, विनायक जयवंत खानविलकर, मंगेश राजाराम जाधव, श्रीकांत विठ्ठल सावंत, नारायण (रमण) भिकाजी प्रभूखानोलकर, उमेश गणपत चाफे, योगेश अनंत पांचाळ, वासुदेव बाबाजी घोले, ॲड. शिवाजी नारायण पोफळे आणि गोविंद विठ्ठल घाडीगावकर यांचा समावेश आहे. समाजासाठी विविध क्षेत्रांत केलेल्या त्यांच्या कार्याचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
समाजसेवकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समाजात सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे अभियानातर्फे सांगण्यात आले. कोकणच्या सामाजिक विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केल्यामुळे समाजसेवा आणि सामाजिक जाणीव वाढविणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0