कृषी पदवीधरांना रोजगारक्षम बनविण्यासाठी पिवळी येथे ६ डिसेंबरला मानसिक परिवर्तन कार्यशाळा
कल्याण (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहापूर तालुक्यातील पिवळी येथे ६ डिसेंबर २०२६ रोजी ‘रोजगारक्षम बनण्यासाठी मानसिक परिवर्तन प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील कृषी पदवीधर, पदविकाधारक तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण युवकांना सहभागी होता येणार आहे.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची २७ डिसेंबर २०२६ रोजी जयंती असून, हा दिवस राज्यातील कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य, वन, फलोद्यान आणि जैविक शेती आदी शाखांतील पदविकाधारक व पदवीधरांसाठी ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने २२ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कृषी शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रत्यक्ष रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५० मध्ये स्थापन केलेल्या संस्थेच्या विचारधारेतून तसेच कृषी क्षेत्रातील विविध समित्यांच्या शिफारशींच्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ या सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे.
तत्कालीन राज्यपाल आचार्य देवव्रत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले आहे. याच विचारातून छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे अमरावती येथील सेवानिवृत्त प्रकल्प संचालक यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानाचा आधार घेत मागील वर्षापासून शहापूर तालुक्यातील पिवळी येथील माहूली गड कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाला आत्मा, ठाणेचे प्रकल्प संचालक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यशाळेत कल्याण, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील इच्छुक युवकांना सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले असून, प्रशिक्षणार्थींची संख्या ६० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ कृषी पदवीधर आणि पदविकाधारकच नव्हे, तर दहावी व बारावी उत्तीर्ण युवकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
इच्छुकांनी नोंदणीपूर्वी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या संस्थेची कार्यपद्धती आणि मराठी भाषेतील मार्गदर्शक सूचनांची माहिती समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर कार्यशाळेसाठी नोंदणी करता येणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती प्रकल्प, पिवळीचे अध्यक्ष प्रा. मधुकरराव देशमुख (मो. ९३५६७६४०३७) किंवा महासंचालक डॉ. मंगेश देशमुख (मो. ९२८४८२३५२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पिवळी येथील कार्यशाळेनंतर अमरावती, अकोला, नाशिक, रायगड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागांत टप्प्याटप्प्याने अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0