उंबर्डे कचरा प्रकल्पातील सुपरवायझर मारहाण प्रकरणाचे स्थायी समितीत पडसाद
कल्याण (प्रतिनिधी) : उंबर्डे कचरा प्रकल्पातील सुपरवायझरला कथित मारहाण केल्याच्या प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) स्थायी समितीच्या सभेत उमटले. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप असतानाही संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल शिवसेनेच्या शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी उपस्थित केला. स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांनीही या प्रकरणातील प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी उंबर्डे कचरा प्रकल्पाची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने प्रकल्पातील सुपरवायझरला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी महापालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे हेदेखील उपस्थित होते.
या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांनी पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न महेश गायकवाड यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला. मात्र, या प्रश्नावर उपायुक्त रामदास कोकरे यांना समाधानकारक उत्तर देता आले नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, नगरसेवक जयवंत भोईर यांनीही या पाहणी दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली. उंबर्डे कचरा प्रकल्प आपल्या प्रभागात येत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना पाहणी दौऱ्याची माहिती देण्यात आली नाही, असे त्यांनी सभेत निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणामुळे उंबर्डे कचरा प्रकल्पातील कथित मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावर प्रशासनाने घेतलेली भूमिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत चर्चेचा विषय ठरला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0