डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह चौघांची आधारवाडी कारागृहात रवानगी

Monday, October 5, 2026 - 01:59
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह चौघांची आधारवाडी कारागृहात रवानगी
संग्रहित छायाचित्र

कल्याण (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केल्यानंतर रविवारी (४ ऑक्टोबर) त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर चौघांना आधारवाडी कारागृहात रवाना करण्यात आले.

शास्त्रीनगर रुग्णालयात ६ जुलै २०२६ रोजी डॉक्टर व परिचारिकांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांवर डॉ. सृष्टी बावीस्कर, डॉ. वैभव साळुंखे तसेच परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेनंतर चौघांना न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र, फिर्यादी डॉक्टरांच्या वतीने जामीन आदेशाला आव्हान देण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता चौघांचा जामीन रद्द करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौघे रविवारी कल्याण न्यायालयात हजर झाले. न्यायालयीन कोठडीचे आदेश झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी केली. या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, वैद्यकीय क्षेत्राचेही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0