दादरमध्ये आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात मोफत सेमिनार उत्साहात संपन्न

Tuesday, October 27, 2026 - 00:58
दादरमध्ये आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात मोफत सेमिनार उत्साहात संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): इंडियन इम्पोर्टर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (IICCI) आणि शिवराज्य ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील शिवाजी मंदिरमधील शाहू सभागृहात आयोजित करण्यात आलेला ‘युवकांसाठी आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात मोफत सेमिनार’ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुंबई आणि परिसरातील तरुण तसेच नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या सेमीनारचे उद्घाटन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना मिळणारी मागणी आणि त्यातून तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवनवीन संधी यावर या सेमिनारमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आयात-निर्यात क्षेत्रात पाऊल ठेवताना येणाऱ्या अडचणी, कायदेशीर प्रक्रिया आणि शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांनी यावेळी युवकांना दिली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून 'IICCI' चे अध्यक्ष राजेश कैथवास आणि इंटरनॅशनल बिझनेस कोच डॉ. संजय रहाटे उपस्थित होते. याप्रसंगी शिवराज्य ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरण्याचे आवाहन केले. तसेच भव्य मेळाव्याला शिवराज्य ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय बल्लाळ, प्रदेश उपाध्यक्ष सागर भोसले, प्रदेश सचिव प्रविण आंब्रे, कार्यालयीन सचिव नरेश जाधव, प्रदेश संघटक अरुण काकडे, मुंबई विभागीय अध्यक्ष सोपान सावंत आणि कोकण विभागीय अध्यक्ष सुजय सावंत आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच समन संघटनेच्या फुलाताई जाधव यांच्यासह या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

उपस्थितांशी संवाद साधताना अनेक उद्योजकांनी, "आयात-निर्यात क्षेत्रात सध्या प्रचंड वाव असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जागतिक स्तरावर व्यापार वाढवण्यास आम्ही नक्कीच इच्छुक आहोत," असे सकारात्मक मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन धनंजय आंबेरकर यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0