उंबर्डे कचरा प्रक्रिया केंद्रातील मशिनरी बंद; आमदार सुलभा गायकवाड यांची पाहणी
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे कचरा प्रक्रिया केंद्रातील बंद मशिनरी, कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधनांचा अभाव आणि कचरा वेचण्याच्या कामात अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी केंद्राची पाहणी करून ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, पाहणीवेळी कार्यकर्त्याकडून सुपरवायझरला मारहाण झाल्याचा आरोप झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
कचरा प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ठेका देण्यात आला असतानाही केंद्रातील मशिनरी बंद असून मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचा दावा आमदार गायकवाड यांनी केला. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे व आवश्यक सुरक्षा साधने नसणे, अल्पवयीन मुलांकडून कचरा वेचण्याचे काम करून घेणे आणि केंद्रातून निघणारे भंगार खासगी व्यावसायिकाकडे पाठवले जात असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले. डंपिंग ग्राउंडवरील वाहनांच्या कागदपत्रांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
केंद्रातील सर्व मशिनरी तातडीने सुरू करावी, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि ठेकेदाराच्या कामातील अनियमितता चौकशीत सिद्ध झाल्यास कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. कचऱ्यावर प्रत्यक्ष प्रक्रिया होत नसल्यास कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कशासाठी केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सुपरवायझरने मद्यप्राशन केल्याचा आरोप करत एका भाजप कार्यकर्त्याने त्याच्याशी वाद घातला आणि कानशिलात लगावल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार आमदार गायकवाड आणि केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सुपरवायझरने मद्यप्राशन केल्याच्या आरोपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उपायुक्त डॉ. कोकरे यांनी स्पष्ट केले. आता कचरा प्रक्रिया केंद्रातील कामकाज, बालकामगारांच्या आरोपांची सत्यता आणि सुपरवायझरला मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0