ओकबागेतील ‘नाना नानी पार्क’ नामफलकाविना; केडीएमसीच्या उद्यान विभागाचा कारभार चर्चेत
कल्याण (प्रतिनिधी): कल्याण पश्चिमेतील ओकबाग परिसरात असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘नाना नानी पार्क’ उद्यानाचा नामफलक गेल्या काही महिन्यांपासून गायब असल्याचे दिसून येत आहे. नामफलक खराब झाल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव तो यापूर्वीच काढण्यात आला होता. मात्र, नव्याने लोखंडी गेट बसविण्यात आले असले तरी अद्याप नवीन नामफलक लावण्यात आलेला नाही. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उद्यानाची वेळ आणि इतर आवश्यक सूचनांचा फलकही नसल्याने महापालिकेच्या वृक्ष व उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या उद्यानात दिवसभर तसेच सायंकाळच्या वेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने येतात. यापूर्वी उद्यानात लहान मुलांसाठी छोटी रेलगाडीही उपलब्ध होती. लहानग्यांचे आकर्षण असलेली रेलगाडी व तिचा मार्ग काढून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. या सार्वजनिक उद्यानाची ओळख स्पष्ट करणारा नामफलक आणि नागरिकांना आवश्यक असलेली माहिती देणारा सूचनाफलक प्रवेशद्वारावर असणे अपेक्षित आहे. मात्र, या मूलभूत बाबींकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. नवीन व्यक्ती या परिसरात आल्यास हे उद्यान महापालिकेचे आहे की खासगी, असा प्रश्न पडू शकतो.
सदर उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी एका संस्थेकडे देण्यात आली आहे. या संस्थेचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसायही उद्यानात चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे सांगितले जाते. असे असताना उद्यानाचा नामफलक आणि आवश्यक सूचनाफलक लावण्याची बाब प्रलंबित राहिल्याने महापालिकेचा वृक्ष व उद्यान विभाग तसेच देखभालीची जबाबदारी असलेल्या संस्थेची भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणत्या अटींवर देण्यात आली आहे, नामफलक व सूचनाफलक लावण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि या कामासाठी महापालिकेकडून काही निर्देश देण्यात आले आहेत का, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे.
कंपाउंड वॉलच्या कामाची माहिती ‘माहिती अधिकारा’त अप्राप्त
दरम्यान, या उद्यानाच्या कंपाउंड वॉलचे तसेच इतर डागडुजीचे काम साधारण मे २०२५ मध्ये करण्यात आले होते. या कामासंदर्भातील कार्यारंभ आदेश, अंदाजपत्रक (एस्टिमेट) आणि अन्य संबंधित कागदपत्रांची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने महापालिकेकडे मागितली होती. मात्र, मागणी करूनही माहिती मिळाली नसल्याने संबंधित कार्यकर्त्याने प्रथम अपील दाखल केले.

प्रथम अपील अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे आदेश दिल्यानंतरही संबंधित अभियंत्याने विहीत कालमर्यादेत माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करण्यात आले आहे. परिणामी, उद्यानातील दुरुस्तीच्या कामाच्या खर्चासह प्रशासकीय प्रक्रियेबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
सार्वजनिक उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण असते. त्यामुळे उद्यानाचा नामफलक, प्रवेशाच्या वेळा, आवश्यक सूचना आणि देखभालीसंबंधी माहिती नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे गरजेचे आहे. ओकबागेतील नाना नानी पार्कच्या या स्थितीकडे महापालिकेच्या वृक्ष व उद्यान विभागाने तातडीने लक्ष देऊन नामफलक व सूचनाफलक बसवावेत, तसेच देखभाल व्यवस्थेची पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0