'प्रौढ प्रताप पुरंदर' महानाट्यात इतिहासाचे विकृतीकरण? संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या 'प्रौढ प्रताप पुरंदर' या महानाट्यामध्ये ऐतिहासिक घटनांचे चुकीचे चित्रण, संदर्भांची मोडतोड आणि इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी महानाट्याचे दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडिक यांना तीव्र स्वरूपाचे निवेदन देण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांत लेखी तक्रार दाखल करत पोलीस आयुक्तांकडेही योग्य त्या कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
महानाट्यात अफजलखान वध प्रसंग व संदर्भांकडे झालेले दुर्लक्ष, १० नोव्हेंबर १६५९ रोजीच्या प्रतापगडावरील भेटीदरम्यान अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा संघर्ष, महाराजांवर झालेला वार आणि अंगरक्षकांच्या योगदानाचे योग्य चित्रण महानाट्यात प्रभावीपणे दाखवण्यात आलेले नाही. तसेच अफजलखानाच्या दफनस्थळ व कबरीच्या व्यवस्थेबाबतच्या ऐतिहासिक नोंदींकडेही दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महानाट्यात रामायण-महाभारतातील गांडीव धनुष्याचा संदर्भ जोडून महाराजांच्या तोंडी संवाद दिले गेले आहेत. महाराज हे दैवी चमत्कारावर नव्हे, तर बुद्धीचातुर्य, पराक्रम आणि रयतेच्या जोरावर स्वराज्य उभे करणारे नेतृत्व होते; त्यांना अशा प्रकारे धार्मिक चौकटीत बांधणे अयोग्य असल्याचे ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.
रायगडवरील ६ जून १६७४ रोजी झालेला राज्याभिषेकाचा सोहळा म्हणजे तत्कालीन सामाजिक व धार्मिक व्यवस्थेचे आव्हान होते. राज्याभिषेकावेळी धर्मशास्त्रीय वर्तुळातून व पंडित वर्गातून झालेल्या विरोधाचा आणि तत्कालीन सामाजिक संघर्षाचा मूळ इतिहास महानाट्यातून टाळण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
महानाट्य सादरीकरणातील सर्व चुकीचे प्रसंग आणि संवादांची तातडीने ऐतिहासिक पडताळणी करावी, ऐतिहासिक संदर्भांशी विसंगत असलेले चित्रण तात्काळ सुधारावे, महानाट्यात झालेल्या ऐतिहासिक चुकांबद्दल शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली जावी व पुढील प्रयोगांपूर्वी इतिहास अभ्यासकांची समिती नियुक्त करून संपूर्ण तपासणी केली जावी, आदी मागण्या संभाजी ब्रिगेडने केल्या आहेत.
संभाजी ब्रिगेडचा विरोध कोणत्याही कलाकृतीला नसून खरा, वस्तुनिष्ठ इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा हीच भूमिका आहे. मात्र, या आक्षेपांची दखल न घेतल्यास कायदेशीर मार्गाने योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके-धामोरीकर यांनी दिला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांकडेही लेखी तक्रार नोंदवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, तसेच पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रतनकुमार नवले, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांच्यासोबत चर्चा घडवून आणली. यावेळी दिग्दर्शकांनी पुढील प्रयोगात याबाबतीत सर्व सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. तसेच यापुढे सातत्याने रचनात्मक कार्यकृती उभारताना इतिहासात तडजोड करणार नाही, अशी ग्वाही दिल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या वतीने माध्यमांना देण्यात आली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0