कल्याणमध्ये महापौरांचा स्वच्छता स्पेशल ड्राईव्ह; अतिक्रमणधारकांना कारवाईचा इशारा!
कल्याण (प्रतिनिधी ): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते भवानी चौक (प्रेम ऑटो) परिसरात महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. यावेळी संपूर्ण परिसरात डीप क्लिनिंग करून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान उपायुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त सावंत, अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी, सफाई विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेसोबतच रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले आणि फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधातही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत ताकीद देण्यात आली असून, अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली.
फुटपाथ हे नागरिकांच्या सुरक्षित पायी चालण्यासाठी आहेत, अतिक्रमण करण्यासाठी नाहीत. सार्वजनिक रस्ते आणि परिसर स्वच्छ तसेच अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
स्वच्छता ही केवळ एखाद्या मोहिमेपुरती मर्यादित न राहता ती कल्याण-डोंबिवली शहराची ओळख बनली पाहिजे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांसह प्रशासनानेही सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया महापौरांनी या मोहिमेदरम्यान माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
महापौरांच्या या पाहणी दौऱ्यामुळे कल्याण पश्चिमेतील संबंधित परिसरातील स्वच्छता आणि फुटपाथवरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी काळात महापालिका प्रशासनाकडून अशा मोहिमा कितपत सातत्याने राबविल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0