ज्ञानतपस्वी आ. ह. साळुंखे यांच्या डी. लीट. पदवी निमित्ताने….

Sunday, October 11, 2026 - 15:26
ज्ञानतपस्वी आ. ह. साळुंखे यांच्या डी. लीट. पदवी निमित्ताने….

डॉ. आ. ह. साळुंखे हे महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, ज्येष्ठ लेखक, संशोधक आणि प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत. भारतीय संस्कृती, संतपरंपरा, बौद्ध तत्त्वज्ञान, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. विवेकवाद, समतावाद, मानवतावाद आणि सामाजिक न्याय ही त्यांच्या वैचारिक लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रस्थापित समजुतींचे चिकित्सक परीक्षण करून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वतंत्र विचारांची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध विषयांवरील त्यांचे विपुल लेखन व व्याख्याने महाराष्ट्रातील वैचारिक आणि सामाजिक चळवळींसाठी मार्गदर्शक ठरली आहेत. परिवर्तनवादी विचारविश्वात आपल्या स्वतंत्र वैचारिक भूमिकेमुळे डॉ. आ. ह. साळुंखे यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. नुकतीच एमजीएम विद्यापीठातर्फे डॉ. आ. ह. साळुंखे यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात आल्यानंतर प्रस्तुत लेखक जगदीश काबरे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. या निमीत्ताने काबरे यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्याच शब्दांमध्ये…..

ज्ञान, विज्ञान, विवेक आणि समतेची मूल्ये आयुष्यभर निष्ठेने जोपासणारे डॉ. आ. ह. साळुंखे हे माझ्या दृष्टीने समकालीन महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वातील एक उत्तुंग मानदंड आहेत. संस्कृत, मराठी आणि पाली भाषांवरील त्यांचे प्रभुत्व, भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास आणि प्राचीन विचारपरंपरांची त्यांनी केलेली मूलगामी चिकित्सा याविषयी मला नितांत आदर वाटतो. प्रस्थापित आणि साचेबद्ध संकल्पनांना निर्भयपणे प्रश्न विचारण्याची त्यांची बाणेदार वृत्ती आणि सत्यशोधनाची अविश्रांत साधना मला नेहमीच प्रेरणादायी वाटत आली आहे. त्यांच्या समग्र साहित्यकृतींमधून प्रकट होणारी चिकित्सक दृष्टी माझ्या वैचारिक जडणघडणीतही महत्त्वाची ठरली आहे.

विशेषतः त्यांच्या 'चार्वाक दर्शन' या ग्रंथाविषयी माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील इहवादी, भौतिकवादी आणि विवेकनिष्ठ विचारपरंपरेचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. तथागत बुद्धांच्या शील, समाधी आणि प्रज्ञा या मानवतावादी मूल्यांचे त्यांनी आधुनिक संदर्भात केलेले विवेचनही माझ्या विचारांना नवी दिशा देणारे ठरले आहे. 'विद्रोही तुकाराम' या ग्रंथातून त्यांनी संत तुकोबारायांचे बंडखोर, परिवर्तनवादी आणि क्रांतिकारक रूप महाराष्ट्रासमोर उलगडले. परंपरेकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची आणि तिच्यातील परिवर्तनवादी विचारांचा शोध घेण्याची त्यांची पद्धत मला विशेष भावते.

अध्यापक, संशोधक, प्रशासक आणि विचारवंत अशा विविध भूमिकांमधून त्यांनी केलेल्या कार्याविषयी मला मनस्वी आदर वाटतो. साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील त्यांचे प्रदीर्घ अध्यापन, उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदान, मराठी विश्वकोशातील अभ्यासपूर्ण लेखन, राज्याच्या सांस्कृतिक धोरणनिर्मिती प्रक्रियेतील सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक व तात्त्विक विषयांवरील त्यांची विपुल ग्रंथसंपदा यातून त्यांच्या ज्ञानसाधनेची व्यापकता प्रत्ययास येते. ज्ञाननिर्मिती आणि समाजप्रबोधन यांची त्यांनी घातलेली सांगड माझ्यासाठी नेहमीच अनुकरणीय राहिलेली आहे.

माझ्यासाठी त्यांचे खास जवळकीचे नाते आहे. कारण माझी सहजीवनसाथी माधुरीच्या शालेय जीवनात ते तीचे शिक्षक राहिले आहेत आणि माधुरी त्यांची अत्यंत आवडती विद्यार्थीनी होती. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी इतक्या वर्षानंतरही माधुरीची आठवण काढून तिचे कौतुक मला सांगू लागले तेव्हा मला आश्चर्य वाटले. माधुरीच्या घरातल्या व्यक्तीही त्यांना आठवत होत्या, हे विशेष. कारण एवढ्या वर्षाच्या त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेलेले होते; पण माधुरी अजूनही त्यांच्या लक्षात होती. हा माझ्यासाठी अत्यंत आनंददायी क्षण होता.

माझ्या दृष्टीने डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मोठेपण त्यांच्या अफाट विद्वत्तेबरोबरच ती विद्वत्ता समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि वैचारिक गुलामगिरीविरुद्ध वापरण्याच्या त्यांच्या निष्ठेत सामावलेले आहे. त्यांच्या विचारांची बीजे काही अंशी मी माझ्यात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी वैचारिक साहित्याला नवी उंची देणाऱ्या आणि समाजाला विवेकनिष्ठ विचारांची दिशा दाखवणाऱ्या या ज्येष्ठ विचारवंतांचा सहवास लाभणे, त्यांच्याशी संवाद साधता येणे आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता प्रत्यक्ष व्यक्त करता येणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे.

डी.लिट. पदवीने त्यांच्या प्रदीर्घ ज्ञानसाधनेचा गौरव झाला, याचा मला मनापासून आनंद आहे. त्यांच्या विचारांचे आणि साहित्याचे ऋण मान्य करताना त्यांचा विवेकनिष्ठ, समतावादी आणि मानवतावादी वैचारिक वारसा पुढे नेण्याची प्रेरणाही मला मिळते. त्यांच्या परखड, प्रांजळ आणि प्रामाणिक विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

—

लेखक- जगदीश काबरे (सांगली)

मोबाईल नं.: ९९२०१ ९७६८०

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0