केडीएमसी सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य द्या - रमीज मणियार

Thursday, October 29, 2026 - 13:56
केडीएमसी सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य द्या - रमीज मणियार
प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८-अ मधील सफाई कामगारांना दैनंदिन स्वच्छतेची कामे करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि वैयक्तिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक रमीज मोहम्मद रफीक मणियार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे.

प्रभागातील रस्ते, गल्ल्या, नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि इतर परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम सफाई कामगार नियमितपणे करतात. मात्र, हे काम सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक साधने व सुरक्षा साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सफाई कामगारांना झाडू, फावडे, घमेले, कुदळ, टिकाव, पहार, हातगाडी, कचरा उचलण्यासाठी आवश्यक साहित्य आदी साधने वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नाले, गटारे आणि इतर अस्वच्छ ठिकाणी काम करताना कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हातमोजे, सुरक्षा बूट, नाक-मुख संरक्षणासाठी मास्क, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि रेनकोट यांसारखे वैयक्तिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आवश्यक साधनसामग्री आणि सुरक्षा साहित्याअभावी सफाई कामगारांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम स्वच्छता व्यवस्थेवरही होऊ शकतो. त्यामुळे कामगारांची संख्या आणि त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक साहित्याची निश्चिती करून ते प्रभागनिहाय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मणियार यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन सफाई कामगारांना आवश्यक साधने आणि सुरक्षा साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग), मुख्य भांडार व्यवस्थापक आणि संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनाही देण्यात आल्या आहेत. आता या मागणीवर महापालिका प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0