वृक्षसंवर्धनाचा उपदेश करणाऱ्या केडीएमसीच्या उद्यानातच झाडांवर रोषणाई!
कल्याण (प्रतिनिधी) : शहरातील झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्या व्यावसायिक आणि विविध आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगारणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्याच उद्यानात झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील संतोषी माता मंदिर रोडवरील एचडीएफसी बँकेच्या बाजूला असलेल्या ज्येष्ठ नागरिक उद्यानातील सुमारे १० झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या उद्यानाची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडूनच हा प्रकार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खासगी आस्थापनांना नियमांचा धाक दाखविणाऱ्या महापालिका प्रशासनाचे स्वतःच्या मालकीच्या उद्यानातील नियमभंगाकडे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांसह वृक्षसंरक्षणासंदर्भातील कायदेशीर तरतुदींच्या आधारे झाडांना खिळे ठोकणे, जाहिराती, पोस्टर्स-बॅनर्स लावणे तसेच झाडांना इजा पोहोचेल अशा पद्धतीने विद्युत रोषणाई करणे प्रतिबंधित आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या उद्यान विभागाने शहरातील झाडांवरील विद्युत रोषणाईविरोधात मोहीम हाती घेतली होती. सर्वेक्षणात शंभरहून अधिक ठिकाणी झाडांवर रोषणाई आढळल्यानंतर संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर शंभरहून अधिक आस्थापनांनी स्वतःहून रोषणाई काढून घेतली, तर उर्वरित ठिकाणी महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.
एकीकडे पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली खासगी आस्थापनांना नोटिसा बजावून झाडांवरील रोषणाई हटविण्याची सक्ती केली जात असताना दुसरीकडे महापालिकेच्याच ज्येष्ठ नागरिक उद्यानातील सुमारे १० झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील विसंगती उघड झाली आहे. शहरातील नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या महापालिकेने सर्वप्रथम स्वतःच्या अखत्यारीतील उद्यानांमध्ये नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करणे अपेक्षित नाही का?
कंत्राटदाराला नियमांची सूट आहे का?
संबंधित उद्यानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारानेच झाडांवर विद्युत रोषणाई केली असल्यास हा प्रकार अधिक गंभीर ठरतो. उद्यानाची देखभाल करताना वृक्षांचे संरक्षण करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असताना झाडांवर अशा प्रकारे रोषणाई करण्याची परवानगी कोणी दिली? यासाठी उद्यान विभागाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का? रोषणाई करताना झाडांना खिळे, तार किंवा अन्य साहित्याच्या माध्यमातून इजा पोहोचविण्यात आली आहे का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या वृक्षसंवर्धन मोहिमेचा उद्देश केवळ खासगी आस्थापनांवरील रोषणाई हटविण्यापुरता मर्यादित राहता कामा नये. नियमांचे उल्लंघन महापालिकेच्या अखत्यारीतील उद्यानात झाले असेल, तर संबंधित कंत्राटदाराचीही चौकशी करून नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच उद्यानाच्या देखभालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करणे गरजेचे आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित उद्यानाची पाहणी करणार का? झाडांवरील विद्युत रोषणाई तातडीने हटविण्याबरोबरच संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार का? तसेच शहरातील इतर महापालिका उद्यानांमध्येही अशा प्रकारे झाडांवर रोषणाई करण्यात आली आहे का, याची तपासणी करणार का?
खासगी आस्थापनांसाठी एक नियम आणि महापालिकेच्या उद्यानांसाठी दुसरा नियम, असा दुहेरी निकष चालणार नाही. वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या महापालिकेने सर्वप्रथम स्वतःच्या अखत्यारीतील उद्यानांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करून दाखवावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, महापालिका मुख्यालय लगत असलेल्या कै. शंकरराव झुंजारराव उद्यानात पु. ल. कट्टा यांच्यामार्फत आयोजित दिपसंध्या कार्यक्रम प्रसंगी उद्यानात गेल्या शनिवारी झाडांचा आधार घेत विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0