केडिएमसी: परवानाधारक टपरी हटविण्याच्या कारवाई प्रकरणी शिवसेनेची आयुक्तांकडे तक्रार
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रुपेश भोईर यांच्या अधिकृत चर्मकार टपरीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्षेप घेतला आहे. या कारवाईत कोणतीही योग्य पूर्वसूचना अथवा पर्यायी व्यवस्था न करता टपरी जबरदस्तीने हटविण्यात आल्याचा आरोप करत, संबंधित टपरी पूर्वीच्या जागेवर ठेवण्याबाबत योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाळा परब यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागातील अधिकारी धनंजय थोरात व ज्ञानेश्वर कंखरे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धट आणि असभ्य पद्धतीने वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. तसेच कारवाई करताना निवडक पद्धतीचा अवलंब होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निवेदनानुसार, रुपेश भोईर हे शिवसेनेचे पदाधिकारी असून, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहसंघटक म्हणून कार्यरत आहेत. शहरातील दैनंदिन सामाजिक आणि गरजू नागरिकांच्या मदतीच्या कामात ते सहभागी असतात. त्यांच्या टपरीवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला असून, व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकट निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रुपेश भोईर यांची टपरी पूर्वी ज्या जागेवर होती, त्याच जागेवर ठेवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनाची चौकशी करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही बाळा परब यांनी दिला
आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0