गौरीपाड्यातील रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेअभावी तीन वर्षांपासून पडून; महेश तपासे आक्रमक

Tuesday, October 27, 2026 - 01:43
Updated: 6 days ago
गौरीपाड्यातील रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेअभावी तीन वर्षांपासून पडून; महेश तपासे आक्रमक

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाची इमारत गेल्या तीन वर्षांपासून तयार असूनही अद्याप रुग्णसेवा सुरू झालेली नाही. सार्वजनिक निधीतून उभारलेली ही इमारत वापराविना पडून असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख महेश तपासे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाला धारेवर धरले आहे.

तपासे यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालय सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. येत्या १ डिसेंबर २०२६ पर्यंत रुग्णालय सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित करून उद्घाटनाची ठोस तारीख जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महेश तपासे यांच्या म्हणण्यानुसार, या रुग्णालयाची इमारत २०२३ मध्ये महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. इमारत तयार असूनही आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने सार्वजनिक पैशांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याची टीका त्यांनी केली.

गौरीपाडा आणि परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी दूरच्या सरकारी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च परवडत नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तपासे यांनी नमूद केले.

रुग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून द्यावीत आणि प्रलंबित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणी तपासे यांनी केली आहे. केवळ इमारत उभारणे पुरेसे नसून नागरिकांना प्रत्यक्ष उपचार मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कोविड काळात खरेदी करण्यात आलेले ऑक्सिजन सिलिंडर आणि वैद्यकीय उपकरणे रुग्णालयाच्या इमारतीत ठेवण्यात आली असल्याचा दावा तपासे यांनी केला. काही साहित्य उघड्यावर पडून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध साहित्याची प्रत्यक्ष मोजणी करावी, उपकरणांची सुरक्षा तपासणी आणि ऑडिट करावे, तसेच साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

रुग्णालय सुरू करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखी तपशील आणि पुढील कामांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत द्यावे, अशी मागणीही तपासे यांनी केली आहे. रुग्णालय सुरू करण्याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. गौरीपाड्यातील १०० खाटांचे रुग्णालय प्रत्यक्ष रुग्णसेवेत कधी दाखल होणार, तसेच महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0