झाडांचे संरक्षण की जाहिरातींचे आकर्षण? केडीएमसीच्या कारवाईने रोषणाई हटली
कल्याण (प्रतिनिधी) : शहरातील झाडांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई हटविण्याच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनाला व्यावसायिक आणि विविध आस्थापनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटिशीनंतर १०० हून अधिक आस्थापनांनी स्वतःहून झाडांवरील विद्युत रोषणाई काढून घेतली आहे. तर उर्वरित ठिकाणी महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई करत रोषणाई हटविली. या मोहिमेमुळे शहरातील वृक्षांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांसह वृक्ष संरक्षणासंदर्भातील कायदेशीर तरतुदींनुसार झाडांना खिळे ठोकणे, त्यावर पोस्टर्स, बॅनर्स किंवा जाहिराती लावणे तसेच झाडांना इजा पोहोचेल अशा पद्धतीने विद्युत रोषणाई करणे प्रतिबंधित आहे. मात्र, शहरातील विविध भागांमध्ये व्यावसायिक आस्थापना आणि अन्य ठिकाणी झाडांवर विद्युत रोषणाई केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने शहरात सर्वेक्षण केले असता १०० हून अधिक ठिकाणी झाडांवर विद्युत रोषणाई केल्याचे आढळून आले. त्यानंतर उद्यान विभागाने वृत्तपत्रांमधून जनजागृती करत संबंधित व्यावसायिक आणि आस्थापनांना नोटिसा बजावल्या. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक आस्थापनांनी कोणतीही सक्तीची कारवाई होण्यापूर्वीच स्वतःहून रोषणाई हटवली.
ज्या ठिकाणी अद्याप रोषणाई काढण्यात आली नव्हती, अशा ठिकाणी महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन कारवाई केली. त्यामुळे शहरातील झाडांवरील अनधिकृत विद्युत रोषणाई हटविण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. महापालिकेच्या या कार्यवाहीबद्दल पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
यापुढे शहरातील कोणत्याही झाडाला खिळे ठोकणे, जाहिराती किंवा पोस्टर्स-बॅनर्स लावणे तसेच झाडांच्या नैसर्गिक वाढीस किंवा सुरक्षिततेस बाधा पोहोचेल अशा पद्धतीने विद्युत रोषणाई करणे टाळावे. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे.
शहराचे सौंदर्य वाढविताना पर्यावरण आणि वृक्षांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यावसायिक, आस्थापनाचालक आणि नागरिकांनी झाडांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0