अंगणवाड्यांमध्ये दिवाळीचा उत्साह; चिमुकल्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ!
ठाणे (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणाचा आनंद आणि उत्साह बालवयातच मुलांच्या मनात रुजविण्यासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कल्याण ग्रामीणअंतर्गत खडवली व गोवेली या दोन्ही बीटमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांसाठी आयोजित या उपक्रमांमध्ये बालकांसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दिवाळीचे औचित्य साधून अंगणवाडी केंद्रांमध्ये आकाशकंदील तयार करणे, पणत्यांना आकर्षक रंग देणे आणि दिवाळी किल्ल्याची निर्मिती करणे अशा सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालकांनी आपल्या कल्पकतेनुसार विविध कलाकृती साकारत आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे, पालकांनीही मुलांसोबत प्रत्यक्ष सहभागी होत त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
बालवयातच मुलांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, त्यांच्यातील कलात्मक कौशल्य विकसित व्हावे आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख व्हावी, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश होता. केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी अशा उपक्रमांमुळे बालकांना मिळते. त्याचबरोबर मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळण्यासह पालक आणि बालकांमधील संवाद, जिव्हाळा व परस्पर सहभागही वाढण्यास मदत होते.
या उपक्रमांसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री मोहनराव साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षिका उषा लांडगे यांनी उपक्रमांच्या नियोजन आणि आयोजनासाठी सहकार्य केले. अंगणवाडी केंद्रे ही केवळ बालकांच्या पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची केंद्रे नसून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहेत, हे या उपक्रमांतून अधोरेखित झाले. बालकांच्या शैक्षणिक आणि सर्जनशील विकासात पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0