शिळफाटा वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो मार्ग '१२ अ' ला राज्य शासनाची मंजुरी

Thursday, October 29, 2026 - 00:43
Updated: 3 days ago
शिळफाटा वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो मार्ग '१२ अ' ला राज्य शासनाची मंजुरी
एआय निर्मीत

डोंबिवली (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवली आणि शिळफाटा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुखकर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रो मार्ग १२ अ या विस्तारित मार्गिकेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासह मुंबई महानगर प्रदेशातील विविध शहरांदरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत, या प्रकल्पाला मंजुरी मिळणे ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया येधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. मेट्रो मार्गिकेसोबतच उन्नत रस्ते आणि उड्डाणपुलांची उभारणी करून डबल डेकर स्वरूपात एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन असल्याने परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

मेट्रो मार्ग १२ अ ची लांबी १८.४ किलोमीटर असून या मार्गावर १२ उन्नत स्थानके उभारण्यात येणार आहेत. या मार्गिकेची मेट्रो मार्ग १२ आणि मेट्रो मार्ग ५ यांच्याशी तसेच कल्याण-शिळफाटा, महापे आणि तळोजा परिसरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांशी जोडणी होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध शहरांदरम्यान प्रवास करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास, प्रवासाचा वेळ वाचण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होऊ शकते. मेट्रो, उन्नत रस्ते आणि उड्डाणपुलांचे एकात्मिक जाळे विकसित झाल्यास शिळफाटा परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मेट्रो मार्ग १२ अ या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे  मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0