अंधारलेल्या आदिवासी वस्त्या उजळल्या; आयुक्तांचे आश्वासन पूर्ण
टिटवाळा (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून पथदिव्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या टिटवाळा परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येला खऱ्या अर्थाने प्रकाशाची नवी पहाट उजाडली आहे. रात्रीच्या वेळी अंधारात असलेल्या विविध आदिवासी वस्त्यांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने ५० पथदिवे कार्यान्वित केल्याने परिसर उजळून निघाला आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेले आश्वासन अल्पावधीत पूर्ण झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
काही आठवड्यांपूर्वी टिटवाळा परिसरातील विविध आदिवासी पाड्यांमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन आपल्या वस्त्यांमधील पथदिव्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी ये-जा करताना नागरिकांना होणारा त्रास, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच दैनंदिन जीवनातील गैरसोयी याबाबत त्यांनी आयुक्तांकडे व्यथा मांडली होती. या वस्त्यांमध्ये पथदिवे बसविण्याची मागणीही करण्यात आली होती.
आदिवासी बांधवांची समस्या गांभीर्याने घेत आयुक्त गोयल यांनी लवकरात लवकर पथदिवे बसविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाला विविध आदिवासी पाड्यांमध्ये १०० पथदिवे बसविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. आयुक्तांच्या निर्देशानंतर अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून विद्युत विभागाने कामाला गती दिली. परिणामी, दिवाळीपूर्वीच पहिल्या टप्प्यातील ५० पथदिवे कार्यान्वित करण्यात आले.
दहा वस्त्यांमध्ये ५० पथदिवे कार्यान्वित
विद्युत विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी केलेल्या कार्यवाहीत ठाकूर पाडा येथे ६, गणेश विद्यालय परिसरातील आदिवासी पाडा येथे ८, एमटीडीसीजवळील आदिवासी पाड्यात ८, गणेश मंदिराजवळील आदिवासी पाड्यात ११, गणेशवाडी दर्गा परिसरात ११, मिलिंद नगर (बिर्ला कॉलेजमागे) येथे २, इंदिरानगर येथे ३, वाघमारे आळी येथे ४, कातकरी वस्ती, कल्याण येथे १ आणि आधारवाडी जेलमागील वस्तीमध्ये ४ पथदिवे बसविण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ५० पथदिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
टिटवाळा परिसरातील एकूण २२ आदिवासी पाड्यांमध्ये पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने काम करण्यात येत आहे. २०२४ ते २०२६ या कालावधीत यापूर्वी १८५ पथदिवे बसविण्यात आले आहेत. तर २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आणखी १०० पथदिवे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ५० पथदिवे कार्यान्वित झाले असून उर्वरित ५० पथदिवेही लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पथदिवे कार्यान्वित झाल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारातून मार्ग काढण्याची वेळ आता नागरिकांवर येणार नाही. विशेषतः महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्या वस्त्या प्रकाशाने उजळलेल्या पाहून आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0