भारत-चीनच्या युवकांमधील संवादाला चालना; कल्याणमध्ये ‘ग्लोबल यूथ समिट संपन्न
कल्याण (प्रतिनिधी) : भारत, चीन आणि सिंगापूरमधील राजनैतिक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी आंतरराष्ट्रीय संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि युवा नेतृत्व या विषयांवर संवाद साधला. कल्याण येथील बी. के. बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये आयोजित ‘ग्लोबल यूथ समिट २०२६’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक सहकार्य आणि भारत-चीनमधील युवकांचे परस्पर संबंध दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील बी. के. बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये नुकतेच दोन दिवसीय ‘ग्लोबल यूथ समिट २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान विविध देशांतील प्रतिष्ठित राजनैतिक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी जागतिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि युवा नेतृत्व यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद साधला.
या कार्यक्रमाला मुंबईतील सिंगापूर प्रजासत्ताकाचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) चेओंग मिंग फोंग, भारतीय विदेश सेवेतील अधिकारी स्वप्निल थोरात, चीनच्या पीपल्स रिपब्लिकचे महावाणिज्यदूत किन जी, तसेच चीनी वाणिज्यदूतावासाचे कौन्सिलर वांग जिनशेन आणि उप-वाणिज्यदूत मा झाओचेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिंगापूरचे महावाणिज्यदूत चेओंग मिंग फोंग यांनी सिंगापूरची बहुसांस्कृतिक ओळख आणि राजनैतिक संबंध दृढ करण्यामध्ये सांस्कृतिक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. तर भारतीय विदेश सेवेतील अधिकारी स्वप्निल थोरात यांनी वैज्ञानिक संशोधन आणि राजनैतिक क्षेत्र यांमधील साम्य स्पष्ट करताना वस्तुनिष्ठ तथ्ये, संयम आणि मानवी विवेक यांचे महत्त्व विशद केले.
समारोप सत्रात चीनचे महावाणिज्यदूत किन जी यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी सह-अभ्यासक्रमीय उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. केवळ शैक्षणिक अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
ब्रिक्स देशांमधील सामायिक मूल्यांचा उल्लेख करत किन जी यांनी भारत आणि चीनमधील युवकांना परस्पर संवाद वाढविण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांतील युवकांना एकमेकांची संस्कृती, विचारसरणी आणि सामाजिक दृष्टिकोन समजून घेण्याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हायला हव्यात. अशा संवादातून परस्पर विश्वास वृद्धिंगत होऊन सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या दोन दिवसीय शिखर परिषदेमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याची, विविध संस्कृती समजून घेण्याची आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याची संधी मिळाली. जागतिक स्तरावरील घडामोडींची जाणीव असलेले, सक्षम, जबाबदार आणि नेतृत्वगुणांनी संपन्न युवक घडविण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0