भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात कल्याण पूर्वेत जनआक्रोश; दोन तासांत १,५५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

Thursday, October 29, 2026 - 00:18
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात कल्याण पूर्वेत जनआक्रोश; दोन तासांत १,५५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

कल्याण (प्रतिनिधी): कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीविरोधात कल्याण पूर्वेतील विविध सामाजिक संस्था एकवटल्या असून, कोळसेवाडी रिक्षा स्टँड येथे आयोजित स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन तासांत १,५५० नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून वृक्षतोडीविरोधात आपला निषेध नोंदवला. या मोहिमेद्वारे सरकारच्या विकास धोरणांवर प्रश्न उपस्थित करत पर्यावरण संवर्धनाची मागणी करण्यात आली.

सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सरकारवर टीका करताना वृक्षलागवडीच्या दाव्यांचा हिशोब मागितला. सरकारकडून ९० हजार झाडे लावण्याचे सांगितले जात असताना, समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी तोडण्यात आलेल्या लाखो झाडांच्या बदल्यात किती झाडे आणि नेमकी कुठे लावण्यात आली, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महामार्गाच्या परिसरात ग्रीन बेल्ट विकसित करण्याचे आश्वासनही प्रत्यक्षात उतरले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबई-गोवा आणि पुणे-तुळजापूर महामार्गांच्या कामांदरम्यान तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात किती वृक्षलागवड झाली, याचाही हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी भोसले यांनी केली.

स्टडी वे संस्थेचे अध्यक्ष उमाकांत यांनी आगामी आंदोलन भीमाशंकर येथे करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते ॲड. धनंजय जोगदंड यांनीही सरकारच्या विकास धोरणावर टीका केली. “जंगल तोडून होणारा विकास हा भकास असतो. आम्ही सरकारला याचा जाब विचारणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या स्वाक्षरी मोहिमेत दोन तासांत १,५५० नागरिकांनी सहभाग घेत भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला. नागरिकांच्या या सहभागामुळे पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वैशाली सोनटक्के, पूजा सरदार, युवा भारत संघटनेचे अध्यक्ष शिवा शाहू, वरद फाउंडेशनचे सुनील डाळिंबे, सर्वात्मका संस्थेचे अध्यक्ष संजय निरभवने, परितोष सिंह, शिवसेनेचे शाखाध्यक्ष सारंग कुंडले, हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष सावंत, ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद दिवेकर, हरिश्चंद्र चन्ने, तुकाराम सिलिमकर, कालिदास कदम, सुभाष गायकवाड, भारत सटाळे, राकेश झांजे, राजेश अडंगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0