कल्याण रेल्वे स्थानकातील उपस्टेशन प्रबंधकावर अश्लील वर्तनाचा आरोप; मनसैनिकांकडून मारहाण
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण रेल्वे स्थानकावर कार्यरत उपस्टेशन प्रबंधक आशुतोष कुमार यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही योग्य कारवाई झाली नसल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रेल्वे विभागाकडे तक्रार केली.
महिला कर्मचाऱ्याची तक्रार मनसेच्या रेल्वे विभागाचे पदाधिकारी प्रथमेश म्हात्रे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आशुतोष कुमार यांना महिला कर्मचाऱ्यासमोर बोलावून कथित अश्लील संदेश पाठविल्याबाबत, तसेच तिला आपल्या घरी येण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या आरोपाबाबत जाब विचारला.
यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी आशुतोष कुमार यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि आशुतोष कुमार यांना मनसैनिकांच्या तावडीतून सोडवून जीआरपी पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, तक्रारदार महिला कर्मचारीही मनसैनिकांसोबत पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिच्या तक्रारीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी आशुतोष कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू तसेच तपासातून समोर येणारी वस्तुस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0