कचोरे-नेतीवली टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज आरमार स्मारक उभारण्याचा मानस

Monday, October 5, 2026 - 16:35
कचोरे-नेतीवली टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज आरमार स्मारक उभारण्याचा मानस

कल्याण (प्रविण आंब्रे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराचा गौरवशाली इतिहास आणि त्यांची सागरी दूरदृष्टी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने कल्याण पूर्वेतील कचोरे-नेतीवली टेकडी परिसरात ‘छत्रपती शिवाजी महाराज आरमार स्मारक’ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या स्मारकासाठी परिसरातील उपलब्ध जागेचा योग्यतेच्या दृष्टीने सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विकास कामे, तसेच नागरी समस्यांबाबत महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. खा. शिंदे यांनी या नियोजित स्मारकासंदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. प्रस्तावित स्मारक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या आरमाराच्या इतिहासाची माहिती नागरिकांना मिळेल, अशा अभ्यासपूर्ण स्वरूपात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची निर्मिती, त्या काळातील जहाजांचे विविध प्रकार, सागरी मोहिमा, आरमारी रणनीती आणि तत्कालीन नौदल सामर्थ्य यांची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी आरमाराच्या भव्य व वास्तवदर्शी प्रतिकृतींसह स्मारक उभारण्याची संकल्पना आहे. त्यामुळे हे स्मारक इतिहास, शौर्य आणि सागरी सामर्थ्याची माहिती देणारे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते.

दरम्यान, डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज स्मारकाच्या सुरू असलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आला. स्मारकासाठी आवश्यक जागा, निधी आणि अन्य बाबींना मंजुरी मिळालेली असून, उर्वरित कामे अधिक जलद गतीने पूर्ण करून हे स्मारक लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी, नगरसेवक विश्वनाथ राणे आणि रवी पाटील उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0