पूर्णेकर हत्याकांडाच्या आडून एकनाथ शिंदेंची बदनामी सहन करणार नाही – आमदार राजेश मोरे

Thursday, October 29, 2026 - 14:56
पूर्णेकर हत्याकांडाच्या आडून एकनाथ शिंदेंची बदनामी सहन करणार नाही – आमदार राजेश मोरे

डोंबिवली (प्रतिनिधी) : ठाण्यातील चर्चित पूर्णैकर हत्याकांडातील पीडित कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळालाच पाहिजे. मात्र, या हत्याकांडाचा आधार घेऊन शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून त्याला प्रत्युत्तर देईल, असा इशारा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांना दिला आहे.

डोंबिवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राजेश मोरे बोलत होते. पूर्णैकर हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली असून, तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, या हत्याकांडाचा मुद्दा पुढे करून शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

‘एकनाथ शिंदे आमच्यासाठी देवासमान’

आमदार राजेश मोरे म्हणाले की, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. एकनाथ शिंदे हे आमच्यासाठी देवासमान आहेत. त्यांची बदनामी करणे आणि त्यांच्यावर विनाकारण आरोप करणे सहन केले जाणार नाही.

आमदारकी किंवा नगरसेवकपदापेक्षा शिवसेना आम्हाला अधिक प्रिय आहे. त्यामुळे शिवसेना आणि तिच्या प्रमुख नेत्यांवर जाणीवपूर्वक किंवा बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना सोडले जाणार नाही, असा इशाराही मोरे यांनी दिला. या पत्रकार परिषदेला राजेश कदम, केडीएमसीतील शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे, माजी नगरसेवक रवि मट्या पाटील, नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0