कल्याणमध्ये ४८७ असाक्षरांची प्रथम चाचणी परीक्षा संपन्न
कल्याण (प्रतिनिधी) : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. महापालिका क्षेत्रातील एकूण ६३ परीक्षा केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही चाचणी घेण्यात आली. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या माध्यमांतील एकूण ४८७ असाक्षरांनी या चाचणीत सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण (योजना) विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार या चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी केडीएमसीच्या शिक्षण विभागाने पूर्वनियोजन केले होते. त्यानुसार सीआरसी प्रमुख आणि परीक्षा केंद्र संचालकांच्या बैठकीत आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रांवरील कामकाजावर सीआरसी प्रमुखांनी नियंत्रण ठेवले.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या क्षेत्रात सर्वेक्षणानुसार एकूण २,०१२ असाक्षरांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४८७ जणांची प्रथम चाचणी घेण्यात आली. चाचणीच्या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांना अधिकारी आणि समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. काही केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे चाचणीत सहभाग नोंदविला.
महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले. चाचणी सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक (SSA), सर्व सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले.
या चाचणीच्या कामकाजासाठी शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी नोडल अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले. तसेच चंद्रमणी सरदार आणि तंत्रस्नेही शिक्षक विलास लिखार यांनीही परीक्षेच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून असाक्षर नागरिकांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून, या चाचणीच्या आयोजनामुळे अभियानाच्या अंमलबजावणीला चालना मिळाली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0