आयात-निर्यात व्यवसायातील संधी; युवकांसाठी मुंबईत मोफत सेमिनार
मुंबई (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक, नवउद्योजक आणि व्यावसायिक यांना आयात-निर्यात व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, या उद्देशाने इंडियन इंपोर्टर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (IICCI) आणि शिवराज्य ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने EXIM EDP (Export-Import Entrepreneurship Development Program) या मोफत मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत दादर येथील शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे.
भारतामधील कृषी उत्पादने तसेच विविध वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध आहे. मात्र, आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्पादनाची योग्य निवड, परदेशी खरेदीदारांशी संपर्क, आवश्यक नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता, बँकिंग प्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांना आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्राथमिक माहिती देण्याबरोबरच प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या सेमिनारमध्ये उत्पादन निवड, परदेशी खरेदीदारांचा शोध, आयात-निर्यात प्रक्रियेतील विविध टप्पे, आवश्यक नोंदणी व कागदपत्रे, बँकिंगविषयक सहाय्य आणि कस्टम हाऊस एजंट (CHA) यांच्याशी समन्वय अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या पुरवठादारांपासून ग्राहकांपर्यंतच्या व्यावसायिक साखळीची उभारणी अर्थात Backward & Forward Linkages याविषयीही माहिती दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पूर्वानुभव नसलेल्या व्यक्तींनाही या क्षेत्राची ओळख करून घेता येणार असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि पुढील टप्प्यांतील मार्गदर्शन व हँडहोल्डिंग सहाय्य मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राजेश कैथवास आणि अमोल जाधवराव हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
मोफत प्रवेशासाठी पूर्वनोंदणी आवश्यक
हा सेमिनार विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक युवक, नवउद्योजक, व्यावसायिक आणि अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करू इच्छिणाऱ्यांनी https://exim-enduser.vercel.app या लिंकवर नोंदणी करून आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0