दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी डोंबिवलीत ‘नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागा’चे आयोजन

Friday, October 9, 2026 - 18:07
दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी डोंबिवलीत ‘नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागा’चे आयोजन

डोंबिवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन शेती-बागायतींना नवसंजीवनी मिळावी आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी, या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात घटस्थापनेच्या दिवशी ‘नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागा’ संपन्न होणार आहे.

रविवार, ११ ऑक्टोबर रोजी प्रधानाचार्य वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या उपस्थितीत या महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, शेती आणि बागायती क्षेत्रात भरभराट व्हावी, बळीराजा सुखी व्हावा तसेच राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध व्हावे, यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या उर्वरित नऊ दिवसांतही विविध पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर दरवर्षी ‘रासरंग दांडिया उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात मोठ्या संख्येने गरबा आणि दांडियाप्रेमी नागरिक सहभागी होतात.

मात्र, यंदा राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यात सुख-समृद्धी नांदावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना या माध्यमातून करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0