शीळफाट्याच्या वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; राजू पाटील यांचा प्रशासनाला अल्टिमेटम

Sunday, October 11, 2026 - 19:09
शीळफाट्याच्या वाहतूक कोंडीवर मनसे आक्रमक; राजू पाटील यांचा प्रशासनाला अल्टिमेटम

डोंबिवली (प्रतिनिधी) : कल्याण-शीळफाटा मार्गावरील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने रविवारी शीळफाटा जंक्शन येथे जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसे नेते राजू पाटील यांनी वाहतूक विभागासह संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन आणि रस्त्यांची तातडीने डागडुजी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनात मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील, जिल्हा सचिव अरुण जांभळे यांच्यासह परिसरातील नागरिक, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि महिलासेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि २७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली.

मेट्रोचे काम, अवजड वाहनांमुळे कोंडीत भर

कल्याण-शीळफाटा मार्गावर मेट्रोची कामे, विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, रस्त्यांची अपुरी क्षमता आणि अवजड वाहनांची वाढती वर्दळ यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. या कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

आंदोलनादरम्यान बोलताना राजू पाटील यांनी शीळफाटा मार्गावरील परिस्थितीची तुलना ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’शी करत वाहतुकीची अवस्था बिकट झाल्याचे म्हटले. रस्त्यांसाठी आवश्यक जागा अद्याप उपलब्ध नसताना आणि विविध कामे पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागण्याची शक्यता असताना संबंधित कामांना वाहतूक विभाग परवानगी देतोच कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाहतूक कोंडीसाठी वाहतूक विभागाच्या नियोजनातील त्रुटी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘अवजड वाहनांचे नियोजन करा’

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांना ठरावीक वेळेत आणि टप्प्याटप्प्याने सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. प्रशासनाने याबाबत योग्य नियोजन न केल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल, असे सांगत अवेळी सोडण्यात येणाऱ्या अवजड वाहनांची तोडफोड करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती वेळेत होत नसल्याबद्दल राजू पाटील यांनी टोल प्रशासनावरही टीका केली. टोल वसुली केली जात असताना रस्त्यांची नियमित डागडुजी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या तीन दिवसांत रस्त्यांची डागडुजी न केल्यास टोलनाकाही फोडण्याचा इशारा त्यांनी दिला.

शीळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे वेळापत्रक निश्चित करणे, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, या प्रमुख मागण्या मनसेने केल्या. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0