केडीएमसी: कॅन्टीनचा अभाव; कर्मचाऱ्यांचा वेळ वाया, नागरिकांची गैरसोय

Friday, October 9, 2026 - 16:23
Updated: 23 days ago
केडीएमसी: कॅन्टीनचा अभाव; कर्मचाऱ्यांचा वेळ वाया, नागरिकांची गैरसोय

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवाजी चौक येथील मुख्यालयात कॅन्टीनची सुविधा उपलब्ध नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना चहापान आणि अल्पोपहारासाठी मुख्यालयाबाहेरील उपहारगृहांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ वाया जात असून, विविध कामांसाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांनाही संबंधित अधिकारी-कर्मचारी जागेवर नसल्याने ताटकळत वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या आवारात कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात कॅन्टीन नसल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता आणि अल्पोपहारासाठी कार्यालयाबाहेर जावे लागते. ये-जा करण्यात वेळ खर्च होत असल्याने त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कर भरणे, विविध परवानग्या मिळवणे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, मुख्यालयातच कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

कॅन्टीनची जुनी सुविधा बंद

महापालिकेच्या मुख्यालयात यापूर्वी कॅन्टीनची सुविधा उपलब्ध होती. मात्र, कालांतराने हे कॅन्टीन बंद पडले. त्यानंतर कॅन्टीनसाठी वापरण्यात येणारी जागा महापालिकेच्या लेखा विभागाला देण्यात आली. त्यामुळे मुख्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहाराची स्वतंत्र व्यवस्था राहिली नाही.

कार्यादेश देऊनही काम सुरू झाले नाही

दरम्यान, तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक इंदूराणी जाखड यांच्या कार्यकाळात महापालिका मुख्यालयाच्या आवारात शेडच्या स्वरूपात कॅन्टीन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामासाठी एका कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कॅन्टीन उभारणीचे काम सुरू झाले नसल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात ‘मराठी वृत्तांत’च्या प्रतिनिधीने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत संबंधित कामाच्या नस्तीचे अवलोकन केले. या अवलोकनातून कॅन्टीन उभारणीचे काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट झाले. उपलब्ध माहितीनुसार, या कामाला स्थगिती देण्यात आली होती. कॅन्टीन उभारणीच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, निविदा प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, याबाबत अद्याप निश्चित कालमर्यादा स्पष्ट झालेली नाही.

महापालिका मुख्यालयात दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ वाचविण्यासाठी कॅन्टीनची सुविधा लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. आता या प्रस्तावाला पुन्हा गती मिळून कॅन्टीन प्रत्यक्षात सुरू होणार का, याकडे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0