निवासी भागातील पाणीटंचाई विरोधात रहिवाशांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा
डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात रहिवाशांनी बुधवारी (२१ ऑक्टोबर) एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता औदुंबर आलाट यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी शुक्रवार आणि शनिवारी प्रस्तावित असलेला सलग ३६ तासांचा पाणीपुरवठा बंद रद्द करण्याची मागणीही रहिवाशांनी केली.
या चर्चेदरम्यान ज्येष्ठ नागरिक संस्थेचे बबन काळे यांनी प्रस्तावित पाणीपुरवठा बंदबाबत तीव्र विरोध दर्शविला. सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा मोठ्या संख्येने पुन्हा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मोर्चात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला. अश्विनी भंडारी यांनीही अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत जाब विचारला. रहिवाशांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा न झाल्यास पुन्हा एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला. या आक्रोश मोर्चात रहिवाशांसोबत विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, बबन काळे, संजय चव्हाण, राजू नलावडे, अजय घोरपडे, अश्विनी भंडारी, आनंद पाटणे, दीपक भानुशाली, किशोर पेटकर, विलास बोरोले यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0