कल्याणमध्ये ‘सेवा संकल्प’ अभियान; नेतिवली टेकडीवर १,५०० वृक्षलागवड
कल्याण (प्रतिनिधी): सर्वांच्या सहभागातून ‘सेवा संकल्प’ अभियान लोकचळवळ म्हणून यशस्वी करूया, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. या अभियानांतर्गत शुक्रवारी कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी येथे वृक्षलागवड आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्तांच्या दालनात विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना आयुक्त गोयल यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी विविध संस्था, एनजीओ तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत वृक्षलागवड आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) सहकार्याने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत नेतिवली टेकडीवर सुमारे १,५०० झाडांची लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त गोयल यांनी दिली. या उपक्रमात सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याच दिवशी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शाश्वत कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. प्लास्टिक, काच, कागद आणि सॅनिटरी वेस्ट यांसारखा कचरा वेगवेगळा करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.
गृहनिर्माण संस्थांनी कागद आणि प्लास्टिकचा कचरा स्वतंत्रपणे जमा करून दिल्यास त्यासाठी प्रति किलो २ रुपये या दराने मोबदला देण्याची योजना असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासाठी स्वतंत्र एजन्सींची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ महापालिकेचे अभियान न राहता सर्वांच्या सहकार्याने लोकचळवळ बनविण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी बैठकीच्या समारोपावेळी केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0