दत्तनगर बाल मित्र मंडळाच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमले दत्तनगर

Wednesday, September 23, 2026 - 03:16
दत्तनगर बाल मित्र मंडळाच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमले दत्तनगर

डोंबिवली (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या दत्तनगर बाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाच्या दुसऱ्या वर्षाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथे हा भक्तिमय सोहळा अत्यंत प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.

मयूरेश्वर सेवा मंडळ संचालित श्री सिद्धिविनायक मयूरेश्वर मंदिराच्या संस्थापिका, गणेशयोगिनी प.पू. सद्गुरू संध्याताई अमृते यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. गणरायाच्या चरणी एकाच सुरात, एकाच भक्तिभावाने आणि श्रद्धेने अथर्वशीर्षाचे पठण करताना उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक एकात्मतेचा सुंदर अनुभव घेतला.

गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता भक्ती, संस्कार, सामूहिकता आणि सामाजिक एकोपा यांचा उत्सव व्हावा, या भावनेतून दत्तनगर बाल मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून यंदा दुसरे वर्ष होते. दुसऱ्या वर्षीही या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद या उपक्रमाची वाढती लोकप्रियता आणि भाविकांचा निर्माण झालेला आत्मीय संबंध अधोरेखित करणारा होता.

या सामूहिक पठणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग. त्याचबरोबर लहान चिमुकले, विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध वयोगटातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत अथर्वशीर्षाचे पठण केल्याने पिढ्यान्‌पिढ्या भक्ती आणि संस्कारांची परंपरा पुढे नेणारा सुंदर संदेश या माध्यमातून मिळाला. याप्रसंगी कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे, स्थानिक नगरसेवक हर्षल राजेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनातून आणि परिश्रमातून हा भक्तिमय सोहळा सुंदररीत्या पार पडला. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक श्रद्धेसोबतच सामूहिक सहभाग, सामाजिक एकोपा आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश दत्तनगर बाल मित्र मंडळाने दिला आहे. विशेषतः महिला, युवक आणि बालकांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची जमेची बाजू ठरली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0