‘गोंधळ’ मराठी चित्रपटाला ऑस्करसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
डोंबिवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
यापूर्वी २०१५ मध्ये ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. भारताच्या ऑस्कर प्रवेशासाठी विविध भारतीय भाषांतील अनेक चित्रपट स्पर्धेत होते. त्यातून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माता संतोष डावखर यांनी ही निवड अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले.
भारतीय मातीत रुजलेली कथा, आंतरराष्ट्रीय दर्जाची सिनेमॅटिक मांडणी, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्यांच्या बळावर ‘गोंधळ’ जागतिक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास डावखर यांनी व्यक्त केला. ऑस्करसाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होणार असून त्यासाठी नियोजनबद्ध रोडमॅप तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘गोंधळ’ पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी असून जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. या यशाचे श्रेय संपूर्ण कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्यांना देत प्रेक्षकांनी चित्रपटगृहात ‘गोंधळ’चा अनुभव घ्यावा आणि भारताच्या ऑस्कर प्रवासाचा भाग व्हावे, असे डावखर यांनी आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0