बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत सहस्रचंडी महायाग; खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवाचा शुभारंभ

Monday, October 12, 2026 - 09:25
Updated: 21 days ago
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत सहस्रचंडी महायाग; खा. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवाचा शुभारंभ

डोंबिवली (प्रतिनिधी) : बळीराजाला सुख-समृद्धी लाभावी, राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा, या मंगल संकल्पनेतून डोंबिवलीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाचा रविवारी भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महायागात सहभागी होत विधिवत पूजा-अर्चा केली.

डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर आयोजित या धार्मिक सोहळ्याचे प्रधानाचार्य वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. घटस्थापना आणि वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात महायागाला सुरुवात झाली. या धार्मिक विधींमध्ये अनेक जोडप्यांनी श्रद्धेने सहभाग घेतला. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांच्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी बांधवांना सुख-समृद्धी लाभावी, शेतीला नवसंजीवनी मिळावी, शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट यावी आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुख, शांती व समाधान नांदावे, या उद्देशाने महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देवीचरणी प्रार्थना करून शेतकरी बांधवांच्या जीवनात समृद्धी नांदावी आणि राज्यातील नागरिकांना सुखाचे दिवस लाभावेत, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.

वैदिक मंत्रोच्चार, विविध पूजाविधी आणि होमहवनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. धार्मिक वातावरणाने भारलेल्या या सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवीच्या तीर्थक्षेत्राची अनुभूती देणारा भव्य सभामंडप

डोंबिवलीतील नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात आलेला भव्य आणि आकर्षक सभामंडप यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. देवीच्या पवित्र तीर्थक्षेत्राची अनुभूती देणारी रचना, देवीच्या मनोहारी प्रतिमा, आकर्षक चित्रे आणि देखणी शिल्पे यांमुळे परिसराला विशेष आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. कलात्मक सजावट आणि धार्मिक परंपरेचा सुरेख संगम साधणारा हा सभामंडप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

डोंबिवली आणि परिसरातील भाविक, नागरिक तसेच संगीतप्रेमींनी नवरात्रोत्सवातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0