वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला महापौर बंगला अखेर गजबजणार! महापौर हर्षाली थविल-चौधरी करणार गृहप्रवेश!

Wednesday, September 23, 2026 - 02:12
वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला महापौर बंगला अखेर गजबजणार! महापौर हर्षाली थविल-चौधरी करणार गृहप्रवेश!

कल्याण (प्रविण आंब्रे): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर बंगला वर्षानुवर्षे बंद अवस्थेत पडून राहिल्यानंतर अखेर त्याला रहिवाशाची चाहूल लागणार आहे. महापौरपदाची सूत्रे हाती घेतलेल्या ॲड. हर्षाली थविल-चौधरी या महापौर बंगल्यात प्रत्यक्ष वास्तव्य करणाऱ्या पहिल्या महापौर ठरणार आहेत. त्यामुळे आधारवाडी परिसरातील हा बंगला पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

महापौरपदासाठी स्वतंत्र निवासस्थान म्हणून महापालिकेने उभारलेली ही वास्तू अनेक वर्षे वापराविना पडून होती. बांधकामासाठी मोठा खर्च झाल्यानंतरही महापौरांच्या वास्तव्यासाठी त्याचा अपेक्षित वापर झाला नाही. उलट, कालांतराने बंगल्याची अवस्था खालावली. झुडपे, गवत, धूळ, खराब झालेले फर्निचर आणि आवश्यक देखभालीअभावी वास्तूची दुरवस्था झाल्याचे यापूर्वी समोर आले होते.

ॲड. हर्षाली थविल-चौधरी यांची ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौरपदी बिनविरोध निवड झाली. सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर केडीएमसीला पुन्हा महापौर मिळाल्याने महापौर निवासस्थानाचा प्रश्नही ऐरणीवर आला. यानंतर महापौरांनी आधारवाडी येथील महापौर बंगल्याची पाहणी केली. पाहणीवेळी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बंगल्याची वास्तू चांगली असल्याचे सांगण्यात आले असले, तरी अनेक वर्षे बंद असल्यामुळे रंगकाम आणि फर्निचरसह काही दुरुस्तीची कामे करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, एखादी सार्वजनिक वास्तू बांधल्यानंतर तिची नियमित देखभाल कोणत्या विभागाची जबाबदारी होती? किती निधी खर्च झाला? कोणत्या कंत्राटदारामार्फत कामे करण्यात आली? कामांची गुणवत्ता तपासली का? आणि वास्तू वापरात नसताना तिच्या देखभालीसाठी महापालिकेने नेमकी कोणती कार्यपद्धती अवलंबली? या प्रश्नांची उत्तरे सार्वजनिक होणे आवश्यक आहे.

महापौर हर्षाली थविल-चौधरी यांच्या वास्तव्यामुळे महापौर बंगला अखेर प्रत्यक्ष वापरात येणार असेल, तर ही बाब महापालिकेच्या दृष्टीने सकारात्मक प्रशासकीय घडामोड ठरू शकते. मात्र त्याचवेळी, बंगल्याच्या दुरुस्ती, रंगकाम, फर्निचर, विद्युत व्यवस्था, सुरक्षा, पाणीपुरवठा आणि इतर सुविधांवर होणाऱ्या खर्चाचा संपूर्ण तपशील नागरिकांसमोर ठेवण्याची गरज आहे.

महापौर थविल-चौधरी या बंगल्यात बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) वास्तव्यास गेल्यानंतर वर्षानुवर्षे बंद असलेली ही वास्तू अखेर वापरात येणार आहे. मात्र या निमित्ताने मागील काळातील खर्चाचा लेखाजोखा, देखभाल-दुरुस्तीची कामे, कंत्राटदार, मंजूर अंदाजपत्रक, प्रत्यक्ष खर्च आणि भविष्यातील देखभाल आराखडा याबाबत पारदर्शकता अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाने केवळ बंगला सजवून महापौरांच्या गृहप्रवेशाची तयारी करण्यापेक्षा “या वास्तूवर आतापर्यंत किती खर्च झाला आणि यापुढे किती होणार?” याचे उत्तरही नागरिकांना द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापौरांचा गृहप्रवेश होणार; आता महापालिका प्रशासनाने जनतेच्या पैशांचा ‘हिशेबप्रवेश’ही करावा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0